दादासाहेब मोकाशी यांची ७६ वी जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी
दादासाहेब मोकाशींनी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी विकासाच्या वाटा निर्माण केल्या.
उपअधीक्षक राजश्री पाटील; दादासाहेब मोकाशी यांची ७६ वी जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.
कराड/प्रतिनिधी : - कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून, यंत्र आणि तंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले आहेत.
या क्षेत्रात उपलब्ध संधींचा लाभ घेत ग्रामीण विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षांत यश मिळवत अधिकारी पदांवरही मजल मारली आहे.
ग्रामीण भागातील अशाच विद्यार्थ्यांसाठी विकासाच्या वाटा निर्माण करण्यात स्व. दादासाहेब मोकाशी यांनी आयुष्य वाहिले, त्यांच्या कार्याची व्याप्ती फार मोठी आहे,
असे प्रतिपादन पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील यांनी केले.
राजमाची (ता. कराड) येथील दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय, मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान व शैक्षणिक संकुलात स्व. दादासाहेब मोकाशी यांच्या ७६ व्या जयंतीनिमित्त
चित्रकला, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
उपअधीक्षक पाटील म्हणाल्या, कृषी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी कृषी उद्योग, व्यवसाय, स्टार्टअप्स आणि स्पर्धा परीक्षांमध्ये अमर्याद संधी उपलब्ध आहेत.
विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकातील शिक्षण न घेता विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन स्वतःमधील कलागुण शोधावेत. मोबाईलच्या आभासी जगापासून दूर राहून
आई-वडील व शिक्षकांच्या मार्गदर्शनाने आयुष्य घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.
कृषी उद्योजक प्रशांत शेंडे यांनी डिजिटल युगातील बदलांवर भाष्य केले. २१ व्या शतकातील स्पर्धात्मक युगात यशस्वी व्हायचे असेल तर वाचनसंस्कृती जोपासणे आवश्यक आहे.
वाचन कमी झाल्याने प्रगल्भता घटते आहे. ज्ञानाची भूक वाढवल्याशिवाय मोठेपणा येत नाही, असे त्यांनी सांगितले.
पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी सांगितले की शालेय स्पर्धांमुळे अपयश स्विकारण्याची शक्ती वाढते. यश किंवा अपयश याचा विचार न करता प्रयत्नांवर भर द्यावा.
सायबर क्राईमचे प्रमाण वाढत असून मोबाईलचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. शिस्त, प्रामाणिकपणा आणि मेहनत यांवरच यशाची उभारणी होते.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार म्हणाले की चारित्र्य हीच खरी ओळख आहे. संस्कार, परंपरा आणि संस्कृती माणूस घडवतात.
सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे करिअर बिघडते. आई-वडिलांचे कष्ट ओळखून त्यांची स्वप्ने पूर्ण करणे हीच खरी कृतज्ञता आहे.
या प्रसंगी मोकाशी शैक्षणिक संकुलातील सौरभ सुरवसे यांची पोलीस उपअधीक्षक पदावर निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
दुधोंडी येथील प्रणव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या आयुष्यावर मनोगत व्यक्त केले. निवडक चित्र व निबंध प्रदर्शनास मान्यवरांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमास संस्थेचे सचिव अभिजीत मोकाशी, उपाध्यक्ष विश्वजीत मोकाशी, संचालक विलास चौधरी,
उपविभागीय अभियंता अक्षय देसाई, तालुका कृषी अधिकारी प्रसाद शेंडे,
सरपंच दादासो डुबल, प्राचार्य पी.पी. पाटील, प्राचार्य सौ. पवार,
प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. सूर्यवंशी मॅडम यांनी
तर सूत्रसंचालन प्रा. माने सर यांनी आभार मानले.
📷 कार्यक्रमातील क्षणचित्रे